ब्लॉगवर आपले स्वागत आहे

शुक्रवार, १४ मे, २०१०

संधीच सोनं

आज कॉलेजमध्ये अगदि लगबग सुरु होती. झाडुन १००% उपस्थिती होती विद्यार्थ्यांची आणि
प्राध्यापक मंडळींचीही. एमबीए मार्केटिंगची अख्खी बॅच हॉलमध्ये पुढच्या जागा अडवुन
बसली होती. अर्थात त्याला कारणही तसचं होत. ख्यातनाम मार्केटिंग गुरु मोहन देसाई
स्पेशल लेक्चर देणार होते. तब्बल एक वर्षाच्या प्रयत्नांनंतर मोहन देसाईंची वेळ मिळवण्यात
कॉलेज व्यवस्थापनाला यश आल होत. मानधनही जबरदस्त मोजलं होतं तेही आगाउ.

मोहन देसाई व्यक्तिमत्वच असं होतं. अनेक रेप्युटेड कंपनीमध्ये त्यांना कन्सल्टंट म्हणुन
नियुक्त केलेल होतं. त्यांच नाव आपल्या कंपनीशी जोडल जाण ही एक सन्मानाची बाब
होती. कॉर्पोरेट जगतात त्यांचा दबदबा होता. अनेक सेमिनार मध्ये त्यांना जावं लागायच.
त्यांनी लिहिलेल पुस्तक सिलॅबसमध्ये होत आणि इतर अनेक पुस्तक हॉट सेलिंग रेंज
मधली होती. महिन्यातले पंधरा दिवस ते परदेशातच असायचे. चारीबाजुंनी पैसाच पैसा,
परदेशात घर,मूंबईत सीफेसिंग फ्लॅट, चार चार गाड्या, जोडीला मानसन्मान आणि आदर.
कन्सल्टन्सीबरोबरच लेक्चर देणे/शिकवणे त्यांना आवडायच आणि केवळ म्हणुनच
सकाळी अमेरिकेतुन भारतात परत आल्यावरदेखिल या कॉलेजमध्ये येण्यासाठी ते निघाले
होते.

मर्सिडिज कॉलेजच्या आवारात शिरली, देसाईसर उतरले. स्वागत, सत्कार झाले. मोहन देसाई
स्पीच द्यायला उभे राहिले. विषयात हातखंडा, अनेक उदाहरण देत, सगळ्यांना गमती-जमती
सांगत मार्केटिंगचे एक एक फंडे ओघवत्या भाषेत सर मांडत होते. सगळे मंत्रमुग्ध होऊन
ऎकत होते. तीन तास नॉनस्टॉप कसे गेले कळलेच नाही कोणाला. सर शेवटच्या मुद्दा मांडत
होते - वेल, प्रत्येक संधीच सोन करणं आणि यशस्वी होणं हे आपल्या हातात असतं.
परिस्थिती प्रतीकुल असेल तर ती आपल्याला हवी तशी चेंज करायची आणि ती चेंज करणं
शक्य नसेल तर स्वतःला चेंज करायच पण नेहमी प्रत्येकाने यशस्वीच व्हायच. ह्याच एक
उदाहरण देतो. २५ वर्षांपुर्वीची सत्यघटना आहे.एकदा एका मोठया चप्पल कंपनीने दोन
सेल्समन नियुक्त केले. दोघांना एका लांबच्या गावी जाउन सेल करण्याची पहिली असाइनमेंट
दिली. दोघही एकाच ट्रेनने निघाले होते, वेगवेगळ्या डब्यात होते आणि एकमेकांना ओळखतहि
नव्हते. दोघ ते स्टेशन येताच उतरले. गावात शिरताच त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली कि
या गावात कोणी चप्पलच वापरत नाही. पहिली पोस्टिंग ती पण या गावात..आता काय
कराव? पहिल्या सेल्समनने विचार केला आणि त्याने हेडऑफिसला फोन लावला. मॅनेजरला
म्हणाला या गावात कोणी चप्पलच वापरत नाही, इथे काहि सेल होणार नाही. मी पुढच्या
ट्रेन ने परत येतोय. आणि तो स्टेशनच्या दिशेने परत निघाला रिर्ट्न तिकिट बुक करायला.
द्सर्या सेल्समनने पण विचार केला आणि त्याने हेडऑफिसला फोन लावला. मॅनेजरला
म्हणाला या गावात कोणी चप्पलच वापरत नाही, इथे खुप स्कोप आहे. एक काम करा
आपल्या स्टॉकमध्ये जितका माल असेल तो सगळा इथे पाठवुन द्या. मी सगळा विकतो.
आणि तो बोलला तसं त्याने केलं. आज तो त्याच नामवंत कंपनी मध्ये मार्केटिंग हेड आहे
आणि फॅट सॅलरी घेतोय. सो फ्रेन्डस, दॅटस इट, IF YOU CANT CHANGE THE
SITUATION, CHANGE YOURSELF AND JUST GRAB THE SUCCESS. THANKS.
टाळ्यांचा कडकडाट झाला.

देसाई स्टेजवरुन खाली उतरणार इतक्यात एका विद्यार्थ्याने विचारलं ’सर, तो दुसरा सेल्समन
तर मार्केटिंग हेड झाला, यशस्वी झाला. पण पहिल्याच काय झाल? तो आज कुठे असेल?
तो अयशस्वी झाला? त्याच्याविषयी सांगा ना’ देसाईंनी एक क्षण त्या मुलाच्या नजरेला नजर
दिली. मग एक मंद स्मित देत म्हणाले ’ वेल, यंगमॅन, तो पहिला सेल्समन आज तुमच्या
समोर उभा आहे. मीच तो. मला वाटत अधिक स्पष्ट करायची गरज नसावी.’ हॉलमध्ये पुन्हा
एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. देसाई विद्यार्थ्यांना ऑटोग्राफस देत देत मर्सिडिज मध्ये
बसुन परत निघाले.

शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

वाढते व.....

लहानपणी ’काय बाई सांगु, कसं गं सांगु, मलाच माझी वाटे लाज, वजनाचा काटा मोडला आज’ हे गाण गाउन जाड्या लोकांची जाम टर उडवायचो आम्ही. खुप हसायचो. तेव्हा गम्मत वाटायची, पण आता...... हल्ली वजन जरा अंमळ जास्तच वाढलय. जास्त म्हणजे दिवसातुन एकदा तरी वजन वाढतय कमी करा अशी कमेंट ऎकायला मिळ्ते आणि ते कमी करण्य़ासाठी उपायही सुचवले जातात. उपाय अनेक उदा.
१) दुधीभोपळ्याचा रस अथवा पावडर खा २) जीम जॉईन करा ३) हाय कॅलरी फुड बंद करा ४) अमुक गोळ्या सुरु करा ५) अमुक डायटिशन कडे जा ६) फक्त फळ, सुप आणि सॅलेड खा, इतर जेवण बंद करा ७) सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात मध आणि लिंबु घालुन प्या ८) माझे सगळे आवडते पदार्थ (पावभाजी, वडापाव, पिझ्झा, चॉकलेट, आइसक्रिम, समोसा, वेफर आणि बरेच..) ज्यांची गणना जंक फुड मध्ये होते ते बंद करणे. ९) दिवसभर गरम पाणी पित राहणे. असे आणि असे अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत.

हे सगळ ऎकुन त्रस्त झालेय मी आणि वजन कमी करायचा निर्णय घेतलाय. अर्थात लोकांच्या कमेंट्स हे एकमेव कारण नाहि तर हल्ली चालण्याचा वेग जरा मंदावल्यासारखा वाटतोय आणि वजन अजुन प्रमाणाबाहेर वाढले तर कमी करणे कठीण जाईल असे वाटतय. तर ... एकुण ८ किलो वजन कमी करण्याचा मानस आहे. इतक वजन कमी करायला किमान एक वर्ष तरी लागेल अस अनुभवी लोकांच मत आहे. त्यासाठी काही झेपतील(?) असे अत्याचार स्वत:वर करणार आहे - १) रोज १ तास (किमान अर्धा तास) चालणे (नेमकं कधी हा मोठा प्रश्न आहे ) २) भात(खुप कठिण आहे), बटाटा आणि साखर बंद करणे ३) रोज ३ लिटर (खुप होतं हे) पाणी पिणे ४) सो कॉल्ड ’जंक’ फुड बंद (जुलुम) ५) रात्री जमल्यास न जेवता फक्त सुप आणि फळांवर राहणे (हा पर्याय मी लास्टला ठेवलाय)
हे सगळं काल ठरवल आणि आज सकाळी नेहमीप्रमाणे निद्रादेवीचा विजय झाला आणि चालायला जायचं राहिलं. सकाळपासुन ३ चहा झाले त्यात एक बिनसाखरेचा होता. दुपारी डबा खाताना कोणाच्या तरी डब्यातुन आलेला ’पालक पनीर आणि आलुफ्राय’ खाल्ल (नाहि म्हटल तर समोरच्याला वाईट वाटेल म्हणुन). पाणी फक्त दोन ग्लास प्यायल गेलाय. आणि ऑफिस मध्ये एकाचा वाढदिवस आहे तर आइसक्रिम मागवलय. असो आज जरी माझ्या वेट कंट्रोल प्लानचे बारा वाजले असले तरी मी अजुन हार मानली नाहीये. हे मिशन पार पाडायचेच आहे.

सोमवार, ५ एप्रिल, २०१०

झू झू - आता वाजले की बारा

जाहिरात क्षेत्रातील क्रिएटीव्हिटीला दाद द्यावी तितकी थोडीच आहे... अनेकदा मूळ कार्यक्रमापेक्षा जाहिरातीच जास्त मनोरंजक असतात ..... पूर्वी लहानपणी एखादा कार्यक्रम पहाताना मध्ये जाहिरात लागली की व्यत्यत आल्या सारख वाटायच कारण पूर्वी कार्यक्रमच दर्जेदार असायचे .... पण आता काही जाहिराती दर्जेदार असतात ..... वोडाफोनच्या 'झू झू ' च्या जाहिराती अशाच आनंद देणार्या आहेत .... हे 'झू झू' आणि त्यांच्या जाहिराती मला जाम आवडतात ... (माझ्या डेस्कटॉपवर, प्रोफाइलवर तुम्हाला झू झू सापडेल :) ).... हल्ली नुकतीच मैत्रिणीने तिच्या सेल वर एक विडियो क्लिप दाखवली .... मस्त आहे .... बघा तुम्हालाही आवडेल ..... आवडली तर जरुर सांगा

शुक्रवार, १९ मार्च, २०१०

संवाद

ब: चेहरा असा का दिसतोय? काय झाल?
अ: काही नाही
ब: सांग ना .... कोणी काही बोलल का?
अ: नाही
ब: मग उदास का?
अ: हम्म
ब: प्लीज़ ..... सांग ना....... मला सांगणार नाहीस ?
अ: --------
ब: (चेहरा दोन्ही हातात घेउन) हे बघ , तू सांगितल्याशिवाय मी इथून हलणारही नाही....
( सगळ भड़भड़ा बोलल जात ..... मन हलक होत).... दुरून गाण्याचे स्वर कानावर येतात ...... 'आजा पिया तोहे प्यार दूँ .... किसलिये तू इतना उदास' ............
नकळत दोघांच्याही चेहर्यावर हसू उमलत......
*********************************************************************************************
५ वर्षानंतर ...............
ब: चेहरा कशाला पडलाय ? रोज रोज पडलेला चेहरा पहायचा मला कंटाला आलाय ..... काय झाल आता?
अ: काही नाही ......
ब: बोल पटकन काय झाल ते ..... नाहीतर नंतर म्हणशील मी विचारल नाही म्हणून .....
अ: काही नाही झाल .....
ब: काही झाल नाहीतर चेहरा पाडून कशाला बसायच ....
अ: ह्म्म्म
ब: शेवटच विचारते , सांगणार आहेस का नीट?
अ: ---------
ब: ओके ... जशी तुझी मर्जी .... नको बोलूस .... नंतर मात्र म्हणू नकोस मी विचारल नाही किंवा वेळ दिला नाही म्हणून
( पुढे कोणी काही बोलत नाही .... मन अजुन दुखावली जातात ....)...... दुरून गाण्याचे स्वर कानावर येतात ...... ' रहते थे कभी जिनके दिल में हम जानसेभी प्यारोंकी तरह....'
दोघही आपापल्या दिशेने चालु लागतात ........

( पुढे कोणी

बुधवार, १७ मार्च, २०१०

श्री स्वामी समर्थ

काल श्री स्वामी समर्थ जयंती ... त्या निमित्ताने मठात जायचे होते .... सकाळी ऑफिसला जाण्याआधी काही कारणाने जायला मिळाले नाही... मग संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर जाऊ अस ठरवल ..... अंधेरी लोखंडवाला येथे स्वामींचा मठ आहे .... चार वर्षांपूर्वी माझ ऑफिस अंधेरी वेस्टला शिफ्ट झाल ... पण जायचा योग आला नव्हता ... काही झाल तरी आज नक्की जायच अस ठरवल .....
माझे बॉस(वय वर्षे ६५, मारवाड़ी) या मठाच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये रहातात ... साधारण ४ च्या सुमारास मी त्यांना म्हटल ' मला तुमच्या घरासमोरच्या मंदिरात जायचे आहे .... तेव्हा संध्याकाळी तिथे मला सोडा' तर 'हो' म्हणाले .... आमच्यात पुढे झालेला संवाद -
मी: गर्दी असेल ना ?
बॉस: गर्दी? वहाँ क्या है? कोई जाता है?
मी: हाँ, वहाँ मंदिर है।
बॉस(कुत्सितपणे): यूपीवाले बाबा की न्यूज सुनी थी कल
माझ डोक सटकल
मी: उस न्यूज से इसका क्या रिलेशन ? व्हाटस दी पॉइंट ऑफ़ कमप्यारीजन?
बॉस गप्प ...
मी: व्हाय यू गो टू शिर्डी सो ऑफ़न ?
या प्रश्नावर उत्तर नाही? राग आला असावा... समोरून निघून गेले... ही मंडळी दर ४/६ महिन्यांनी शिर्डीला जातात... यांच्या मनात भाव / श्रद्धा किती मला खरच माहित नाही ..... 'साईंसत्चरित' नावाचा 'हेमाडपंतांनि लिहिलेला ग्रन्थ आहे हे यांना माहिती नाही .... म्हाळसापति, हेमाडपंत, चांदोरकर कोण हे यांच्या गावीही नसावे ... असो .... 'जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव'... शिर्डी प्रसिद्धि झोतात आहे म्हणून माहीत असेल आणि जात असावेत .... काहीही असो .... पण जर दुसर्यांच्या श्रद्धास्थानाबद्दल माहिती नसेल तर उगाच कोणतीही कमेन्ट करू नये अथवा तिरस्कार व्यक्त करू नये असे माझे स्पष्ट मत आहे ...
मला खुपच राग आला होता .... ऑफिस सुटल्यावर बॉसच तोंडही न पाहता निघाले.... रिक्शा केली आणि सरळ मठात पोचले ....४ वर्षानंतर आले .... स्वामींची इच्छा ..... हा मठ खुप प्रशस्त आणि सुन्दर आहे .... गर्दी होती आणि रांग लावून स्वामींच दर्शन घेतल .... गाभार्यात खुपच सुगंध, प्रसन्नता आणि स्पंदन जाणवली ... नंतर शांतपणे बसून प्रसाद घेउन निघाले .... मन शांत झाल ..... ।। श्री स्वामी समर्थ ।।

मंगळवार, १६ मार्च, २०१०

पाचशेची नोट

काल संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर स्टेशनला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे रिक्षाची वाट पाहत थांबले... वीरा देसाई रोडवरून अंधेरी स्टेशनसाठी रिक्शा मिळन कठीण झालय.... त्यात हल्ली मेट्रोच काम सुरु असल्यामुले स्टेशन ला पोचायला खुप वेळ लागतो आणि रिक्शा यायला तयारही होत नाही ...... अजुन दोन बायका रिक्शासाठी उभ्या होत्या.... एक रिक्शा आली.... त्या दोघिनी विचारल 'नवरंग'? ... तो नाही म्हणाला... मग मी स्टेशन विचारल तर हो म्हणाला ..... चला रिक्शा मिळाली..... आत बसले .... तेवढ्यात एक बाई आली..... साधारण चाळीशिची असेल ..... म्हणाली मलापण स्टेशन ला जायचय ... क्यान आय ज्वाइन?... बाई एकदम हायफाय.... तसाही रिक्शा मिलन प्रोब्लेम असतो , म्हटल ओके .... ती पण बसली .... रिक्शा निघाली ..... मग रस्त्यात मी कुठे जॉब करते, कुठे राहते वगैरे चौकशी तिने माझी केली .... आणि स्वतः ठाण्याला राहते म्हणाली.... मग म्हणाली .... ५०० रु सुट्टे आहेत का ? माझ्याकडे होते पण मी नाही म्हणाले .... न जाणो नोट खोटी असली तर आपल्याला फटका बसायचा ......मग जस स्टेशन जवळ आल तस तिने रिक्शावाल्याला विचारल आपके पास ५०० का छुट्टा है ?..... तोही नाही म्हणाला .... मग मला म्हणते आता मी पैसे कसे देऊ ? मी म्हटल ओके ... मी दिले रिक्षाचे २६रु .... ह्या बाईने सुट्टे १,२ किंवा जे काही सुट्टे असतील ते बघायला / काढायला पर्स ओपनही केली नाही ..... ही फ़क्त ५०० रु नोट घेउनच फिरत असेल का ? मी ओके म्हटल्यावर ही बाई साध थ्यांकयु ही न म्हणता उतरून चालु पडली .... म्हटल जाऊदे ... बहुतेक हिची नोट पण खोटी असावी माझे ५०० रु वाचले किंवा मग हिला अशी फुकट स्टेशन ला जायची सवय असावी .... असो माझा फायदा काही नाही झाला पण नुकसान नाही झाले हे काय कमी आहे ?

सोमवार, १५ मार्च, २०१०

नैराश्य

माहित नाही का पण गेल्या काही दिवसांपासून खुप नैराश्य आणि फ्रस्ट्रेशन आलय ...... काहीच करावस वाटत नाही .....ऑफिस मध्ये पण कामात लक्ष लागत नाहिये.... कोणताच काम धड होत नाहिये ...... मन फार विचित्र झालय..... कसलाही उत्साह नाही .... कसलाही आनंद नाही ...... अगदी टिव्ही पहवासाही वाटत नाहीये ..... वाचन करावास वाटत नाहिये... बोलावस वाटत नाहीये ........ खुप बैचेनी आणि उदासीनता आलिय ...... कधी आणि कशी यातून बाहेर पडेन माहीत नाही ...... मन मनास उमगत नाही .... मज तुझी .................