ब्लॉगवर आपले स्वागत आहे

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

माँ ... मेरी माँ .. प्यारी माँ.. मम्मा ...

आई. माझी आई. साधी सरळ. ती लहान असतानाच तिची आई म्हणजे माझी आज्जी वारली. मग तीनहि भावंडांचा सांभाळ आजोबांनी केला. आजोबा अतिशय कडक शिस्तीचे. त्यांच्या धाकातच मुलं मोठी झाली. त्यात मुलींना जास्त नियम. सगळ चांगल होत, पण तरीहि आईची माया आणि प्रेम लागतच ना... एकटे वडिल ती कमी कधीच पुर्ण करु शकले नाहित. आईच शिक्षण दहावीपर्यंत झालं. मग बाबांनी बघुन दिलं त्या मुलाशी लग्न झालं त्यावेळच्या प्रथेप्रमाणे. त्याकाळी मुलींना कुठे स्वातंत्र्य होतं आपला नवरा शोधण्याच किंवा मत मांडण्याच. आई-वडिलांनी पसंद केलं कि मुली लग्नाला उभ्या रहायच्या।

लग्न झाल सासरी आली. सासरकडचा सगळा खोटेपणा उघड झाला. अनेक हालअपेष्टा कष्टांना सामोर जाव लागलं. आम्हा तिन्ही मुलांना मोठं केलं. अनेकवेळा तीची नवरा आणि मुलं यांच्यामध्ये कुचंबणा व्हायची. पण सगळं तीने सहन केलं.. मुलांसाठी.. मुलांवर इतक प्रेम कि कोणीहि तिच्या मुलांना नाव ठेवलेल तिला खपायच नाहि. मला आठवतय कोणीतरी सांगितल होतं मुलाच्या कूंडलीत दोष आहे, १२ संकष्ट्यांना उपवास करायचा आणि तो उपवास जमिनिवर (ताटात नाही) जेवुन सोडायचा. तिने तेही केलं, मुलाच चांगल व्हाव म्हणुन. अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवत नाहि पण आईची माया... एक आई आपल्या मुलांसाठि काहिही करु शकते हे नक्की. कधीहि मारलं नाहि किंवा कोणतीहि बंधन घातली नाहित. उचित स्वातंत्र्य दिलं।

आमच्या प्रत्येक यशाचं तिला कौतुक असे. मी जेव्हा पहिली गाडी घेतली आणि गाडीत बसुन पहिल्यादिवशी ऑफिसला निघाले तेव्हा आई गॅलरीत उभी होती आणि मला बघायच्याऎवजी मला अजुन बिल्डींगमधले पाहाताहेत ते बघत होती. आपल्या मुलांच कौतुक अजुन कोणी केलं कि तीचा आनंदाने ओसंडुन जाणारा चेहरा पहावा. त्या माउलीने आमच्यासाठी काय नाहि केलं आणि आम्ही मात्र नेहमी तिला ग्रुहित धरलं. कमालीच स्वातंत्र्य असुनहि तिचं अनेकदा ऎकलं नाही. अनेकदा उलट उत्तर दिली. आई अनेकदा आमच्या वागण्याने व्यथित आणि शब्दांनी घायाळ झाली. पण लगेच विसरुन जायची, सोडुन द्यायची. जे मिळाल त्यात सुख मानलं. कधी हेच हवं होत अशी अपेक्षा नाहि केली. कोणाचही कधीच वाईट चिंतल नाही।

आज हे सगळं लिहिण्याच कारण म्हणजे आईचा ७५ वा वाढदिवस. आज प्रथमच आम्ही साजरा करणार. आजवर कधीच केला नव्हता. तिला सरप्राइज देणार. तिला काय भेट देणार? काहीतरी देणार हे नक्की. वैतागेल जरा... कशाला खर्च करायचा, आता मला या वयात हे करायचय... वगैरे वगैरे... खरतर तिच्या आवडत्या छोट्या छोट्या गोष्टी घडवुन आणतोय ह्या आठवड्यात... अजुन तरी तिच्या लक्षात आलेलं नाही. परवा किचनमध्ये आईला मदत करत होते, आमच्या अशाच गप्पा चालल्या होत्या. आईचा आवडता गायक मुकेश. मुकेशच एक गाण मी सहज गुणगुणत होते. आईला मुकेशची गाणी ऎकायची इच्छा झाली. मी गेले कॅसेट शोधायला. घर शिफ्ट केलं तेव्हा बर्याच कॅसेट गहाळ झाल्यात, काही त्यांच्या कव्हरमधुन बाहेर आल्यात. मुकेश ची एक पण कॅसेट सापडेना. आई म्हणाली राहुदे नाही सापडत तर. मीही नाद सोडला आणि एक मिक्स सॉंगची कॅसेट लावली. रफी, मन्ना डे, किशोर सगळ्यांची गाणी लागत होती. पण मुकेशच लागेना. मीच नाराज झाले आणि कॅसेट बदलायला गेले तेवढ्यात तेच गाणं जे मी गुणगूणत होते ते लागलं. आम्ही दोघी खुश. ते गाणं होत - जिक्र होता है जब कयामत का, तेरे जलवोंकि बात होती है' (त्या गाण्याची लिंक इथे द्यायची होती पण नाही देता आली )

आईविषयी मी काय लिहिणार...ती खुप मोठी आहे, मी शब्दात व्यक्त करण्याच्या पलिकडच असं व्यक्तिमत्व आहे तिचं.. मला नीट शब्दच सुचत नाहियेत... आता यापुढे तिला अजिबात दुखवायच नाही हेच मनाशी ठरवलय. आजच्या या विशेष दिवशी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि देवाने माझ्या आईला अजुन खुप खुप मोठ्ठ आणि निरोगी आयुष्य द्याव. हल्ली एका गाण्याच्या दोन ओळी मी गुणगुणत असते आईला बघुन... ’ मा.. मेरी मा... प्यारी मा... मम्मा’.....