ब्लॉगवर आपले स्वागत आहे

शुक्रवार, ४ जानेवारी, २०१३

आश्‍वासक बापू


बलात्काराच्या घटना घडल्या नंतर अनेक चर्चा झाल्या. त्या सर्व चर्चांमध्ये अशा आरोपींना कोणती शिक्षा द्यावी, अशा केसेसचा निकाल किती जलद लागावा, स्त्रियांनी स्वतःजवळ मिरचीपूड, स्प्रे, चाकू-सुरे बाळगावे असे अनेक विचार पुढे झाले. पण जी स्त्री त्या घटनेतून जाते तिच्या मनात कोणती सुनामी येत असेल, तिच्या जवळच्या नातेवाईकांची अवस्था काय होत असेल ह्याची कल्पना खरच आपण करू शकत नाही. अशा घटना किती घडतात, किती समाजासमोर येतात, किती तक्रारी नोंदवल्या जातात आणि पुढे त्या तक्रारींच काय होत हे आपल्याला चांगलाच माहित आहे. आज स्त्रियांच्या बाजूने भक्कम उभी राहिलेली 'एकच' व्यक्ती मी पहिली आणि ती म्हणजे सद्गुरु श्री अनिरुद्ध बापू. परम्पुज्य सद्गुरु श्री अनिरुद्ध बापूंनी गुरुवार दिनांक ०३.०१.२०१३ रोजी केलेल्या प्रवचनात स्त्रियांना 'अभय' दिले आहे. त्या प्रवचन काही भाग श्री सामिरसिंह दत्तोपाध्ये यांच्या ब्लोग वर आला आहे. ती लिंक (आश्‍वासक बापू)येथे देत आहे आपल्या सर्वांसाठी. आज मी भयमुक्त आहे आणि खात्रीने सांगू शकते कि माझ्यावर असा प्रसंग कधीच येणार नाही.

 

शनिवार, १० नोव्हेंबर, २०१२

Samirsinh Dattopadhye: The World Today

Samirsinh Dattopadhye: The World Today: ll Hari Om ll  UN P eace Envoy, Mr. Lakhdar Brahimi Y es indeed Syria paints a distressing picture on the canvas of the world. Is ...

मंगळवार, २२ मे, २०१२

चुका




चुका करायच्या, पुन्हा पुन्हा करायच्या

माहित असल्या तरी कधीच नाही स्वीकारायच्या



कुणी दाखवून दिल्या तर दखल नाही घ्यायची

माफी मागायची तर गोष्टच राहिली दूरची



काहीच झाल्यासारखं वागायचं

गावभर दात विचकत फिरायचं



अशा लोकांशी आहे माझं जन्माच वैर

मला नाही वाटत माझी भूमिका आहे गैर


सोमवार, ८ नोव्हेंबर, २०१०

फितूरी

तुजसाठी केला लढा, तुलाच किंमत उरली नाहि
केलेल्या संर्घषाला आता अर्थच उरला नाहि

ठेवलीस न तमा आटवलेल्या रक्ताची
ऐनवेळी समरांगणी पाडलेस तोंडघशी

थुंकलेस तु चेहर्यावर उलटे परतुनी
अपमानीलेस वारंवार हासुनि खिजवुनी

उतरले झेंडे, म्यान झाल्या तलवारी
जाहल्या जखमा कायम खोलवरी

मानवा, कर जल्लोश क्षणैक विजयाचा
होइल पश्चाताप परी तुजला फितुरीचा

मंगळवार, २१ सप्टेंबर, २०१०

वाढदिवस....

आज ह्या ब्लॉगला एक वर्ष पुर्ण झाल... ३६५ दिवस कसे निघुन गेले कळलच नाहि..
ब्लॉग सुरु करताना आपण आठवड्याला एक तरी पोस्ट लिहु असे वाटत होते...
पण तसे झाले नाहि.. आणि हा ब्लॉग ’हवशे नवशे’ ह्या प्रकारात मोडणारा ठरला...
तरीहि २००० च्या वर ब्लॉगविझिटस झाल्या याच आश्चर्य वाटत...
सगळ्यांना धन्यवाद...

शुक्रवार, २० ऑगस्ट, २०१०

माँ ... मेरी माँ .. प्यारी माँ.. मम्मा ...

आई. माझी आई. साधी सरळ. ती लहान असतानाच तिची आई म्हणजे माझी आज्जी वारली. मग तीनहि भावंडांचा सांभाळ आजोबांनी केला. आजोबा अतिशय कडक शिस्तीचे. त्यांच्या धाकातच मुलं मोठी झाली. त्यात मुलींना जास्त नियम. सगळ चांगल होत, पण तरीहि आईची माया आणि प्रेम लागतच ना... एकटे वडिल ती कमी कधीच पुर्ण करु शकले नाहित. आईच शिक्षण दहावीपर्यंत झालं. मग बाबांनी बघुन दिलं त्या मुलाशी लग्न झालं त्यावेळच्या प्रथेप्रमाणे. त्याकाळी मुलींना कुठे स्वातंत्र्य होतं आपला नवरा शोधण्याच किंवा मत मांडण्याच. आई-वडिलांनी पसंद केलं कि मुली लग्नाला उभ्या रहायच्या।

लग्न झाल सासरी आली. सासरकडचा सगळा खोटेपणा उघड झाला. अनेक हालअपेष्टा कष्टांना सामोर जाव लागलं. आम्हा तिन्ही मुलांना मोठं केलं. अनेकवेळा तीची नवरा आणि मुलं यांच्यामध्ये कुचंबणा व्हायची. पण सगळं तीने सहन केलं.. मुलांसाठी.. मुलांवर इतक प्रेम कि कोणीहि तिच्या मुलांना नाव ठेवलेल तिला खपायच नाहि. मला आठवतय कोणीतरी सांगितल होतं मुलाच्या कूंडलीत दोष आहे, १२ संकष्ट्यांना उपवास करायचा आणि तो उपवास जमिनिवर (ताटात नाही) जेवुन सोडायचा. तिने तेही केलं, मुलाच चांगल व्हाव म्हणुन. अशा गोष्टींवर आपण विश्वास ठेवत नाहि पण आईची माया... एक आई आपल्या मुलांसाठि काहिही करु शकते हे नक्की. कधीहि मारलं नाहि किंवा कोणतीहि बंधन घातली नाहित. उचित स्वातंत्र्य दिलं।

आमच्या प्रत्येक यशाचं तिला कौतुक असे. मी जेव्हा पहिली गाडी घेतली आणि गाडीत बसुन पहिल्यादिवशी ऑफिसला निघाले तेव्हा आई गॅलरीत उभी होती आणि मला बघायच्याऎवजी मला अजुन बिल्डींगमधले पाहाताहेत ते बघत होती. आपल्या मुलांच कौतुक अजुन कोणी केलं कि तीचा आनंदाने ओसंडुन जाणारा चेहरा पहावा. त्या माउलीने आमच्यासाठी काय नाहि केलं आणि आम्ही मात्र नेहमी तिला ग्रुहित धरलं. कमालीच स्वातंत्र्य असुनहि तिचं अनेकदा ऎकलं नाही. अनेकदा उलट उत्तर दिली. आई अनेकदा आमच्या वागण्याने व्यथित आणि शब्दांनी घायाळ झाली. पण लगेच विसरुन जायची, सोडुन द्यायची. जे मिळाल त्यात सुख मानलं. कधी हेच हवं होत अशी अपेक्षा नाहि केली. कोणाचही कधीच वाईट चिंतल नाही।

आज हे सगळं लिहिण्याच कारण म्हणजे आईचा ७५ वा वाढदिवस. आज प्रथमच आम्ही साजरा करणार. आजवर कधीच केला नव्हता. तिला सरप्राइज देणार. तिला काय भेट देणार? काहीतरी देणार हे नक्की. वैतागेल जरा... कशाला खर्च करायचा, आता मला या वयात हे करायचय... वगैरे वगैरे... खरतर तिच्या आवडत्या छोट्या छोट्या गोष्टी घडवुन आणतोय ह्या आठवड्यात... अजुन तरी तिच्या लक्षात आलेलं नाही. परवा किचनमध्ये आईला मदत करत होते, आमच्या अशाच गप्पा चालल्या होत्या. आईचा आवडता गायक मुकेश. मुकेशच एक गाण मी सहज गुणगुणत होते. आईला मुकेशची गाणी ऎकायची इच्छा झाली. मी गेले कॅसेट शोधायला. घर शिफ्ट केलं तेव्हा बर्याच कॅसेट गहाळ झाल्यात, काही त्यांच्या कव्हरमधुन बाहेर आल्यात. मुकेश ची एक पण कॅसेट सापडेना. आई म्हणाली राहुदे नाही सापडत तर. मीही नाद सोडला आणि एक मिक्स सॉंगची कॅसेट लावली. रफी, मन्ना डे, किशोर सगळ्यांची गाणी लागत होती. पण मुकेशच लागेना. मीच नाराज झाले आणि कॅसेट बदलायला गेले तेवढ्यात तेच गाणं जे मी गुणगूणत होते ते लागलं. आम्ही दोघी खुश. ते गाणं होत - जिक्र होता है जब कयामत का, तेरे जलवोंकि बात होती है' (त्या गाण्याची लिंक इथे द्यायची होती पण नाही देता आली )

आईविषयी मी काय लिहिणार...ती खुप मोठी आहे, मी शब्दात व्यक्त करण्याच्या पलिकडच असं व्यक्तिमत्व आहे तिचं.. मला नीट शब्दच सुचत नाहियेत... आता यापुढे तिला अजिबात दुखवायच नाही हेच मनाशी ठरवलय. आजच्या या विशेष दिवशी देवाकडे एकच प्रार्थना आहे कि देवाने माझ्या आईला अजुन खुप खुप मोठ्ठ आणि निरोगी आयुष्य द्याव. हल्ली एका गाण्याच्या दोन ओळी मी गुणगुणत असते आईला बघुन... ’ मा.. मेरी मा... प्यारी मा... मम्मा’.....

शुक्रवार, १४ मे, २०१०

संधीच सोनं

आज कॉलेजमध्ये अगदि लगबग सुरु होती. झाडुन १००% उपस्थिती होती विद्यार्थ्यांची आणि
प्राध्यापक मंडळींचीही. एमबीए मार्केटिंगची अख्खी बॅच हॉलमध्ये पुढच्या जागा अडवुन
बसली होती. अर्थात त्याला कारणही तसचं होत. ख्यातनाम मार्केटिंग गुरु मोहन देसाई
स्पेशल लेक्चर देणार होते. तब्बल एक वर्षाच्या प्रयत्नांनंतर मोहन देसाईंची वेळ मिळवण्यात
कॉलेज व्यवस्थापनाला यश आल होत. मानधनही जबरदस्त मोजलं होतं तेही आगाउ.

मोहन देसाई व्यक्तिमत्वच असं होतं. अनेक रेप्युटेड कंपनीमध्ये त्यांना कन्सल्टंट म्हणुन
नियुक्त केलेल होतं. त्यांच नाव आपल्या कंपनीशी जोडल जाण ही एक सन्मानाची बाब
होती. कॉर्पोरेट जगतात त्यांचा दबदबा होता. अनेक सेमिनार मध्ये त्यांना जावं लागायच.
त्यांनी लिहिलेल पुस्तक सिलॅबसमध्ये होत आणि इतर अनेक पुस्तक हॉट सेलिंग रेंज
मधली होती. महिन्यातले पंधरा दिवस ते परदेशातच असायचे. चारीबाजुंनी पैसाच पैसा,
परदेशात घर,मूंबईत सीफेसिंग फ्लॅट, चार चार गाड्या, जोडीला मानसन्मान आणि आदर.
कन्सल्टन्सीबरोबरच लेक्चर देणे/शिकवणे त्यांना आवडायच आणि केवळ म्हणुनच
सकाळी अमेरिकेतुन भारतात परत आल्यावरदेखिल या कॉलेजमध्ये येण्यासाठी ते निघाले
होते.

मर्सिडिज कॉलेजच्या आवारात शिरली, देसाईसर उतरले. स्वागत, सत्कार झाले. मोहन देसाई
स्पीच द्यायला उभे राहिले. विषयात हातखंडा, अनेक उदाहरण देत, सगळ्यांना गमती-जमती
सांगत मार्केटिंगचे एक एक फंडे ओघवत्या भाषेत सर मांडत होते. सगळे मंत्रमुग्ध होऊन
ऎकत होते. तीन तास नॉनस्टॉप कसे गेले कळलेच नाही कोणाला. सर शेवटच्या मुद्दा मांडत
होते - वेल, प्रत्येक संधीच सोन करणं आणि यशस्वी होणं हे आपल्या हातात असतं.
परिस्थिती प्रतीकुल असेल तर ती आपल्याला हवी तशी चेंज करायची आणि ती चेंज करणं
शक्य नसेल तर स्वतःला चेंज करायच पण नेहमी प्रत्येकाने यशस्वीच व्हायच. ह्याच एक
उदाहरण देतो. २५ वर्षांपुर्वीची सत्यघटना आहे.एकदा एका मोठया चप्पल कंपनीने दोन
सेल्समन नियुक्त केले. दोघांना एका लांबच्या गावी जाउन सेल करण्याची पहिली असाइनमेंट
दिली. दोघही एकाच ट्रेनने निघाले होते, वेगवेगळ्या डब्यात होते आणि एकमेकांना ओळखतहि
नव्हते. दोघ ते स्टेशन येताच उतरले. गावात शिरताच त्यांच्या एक गोष्ट लक्षात आली कि
या गावात कोणी चप्पलच वापरत नाही. पहिली पोस्टिंग ती पण या गावात..आता काय
कराव? पहिल्या सेल्समनने विचार केला आणि त्याने हेडऑफिसला फोन लावला. मॅनेजरला
म्हणाला या गावात कोणी चप्पलच वापरत नाही, इथे काहि सेल होणार नाही. मी पुढच्या
ट्रेन ने परत येतोय. आणि तो स्टेशनच्या दिशेने परत निघाला रिर्ट्न तिकिट बुक करायला.
द्सर्या सेल्समनने पण विचार केला आणि त्याने हेडऑफिसला फोन लावला. मॅनेजरला
म्हणाला या गावात कोणी चप्पलच वापरत नाही, इथे खुप स्कोप आहे. एक काम करा
आपल्या स्टॉकमध्ये जितका माल असेल तो सगळा इथे पाठवुन द्या. मी सगळा विकतो.
आणि तो बोलला तसं त्याने केलं. आज तो त्याच नामवंत कंपनी मध्ये मार्केटिंग हेड आहे
आणि फॅट सॅलरी घेतोय. सो फ्रेन्डस, दॅटस इट, IF YOU CANT CHANGE THE
SITUATION, CHANGE YOURSELF AND JUST GRAB THE SUCCESS. THANKS.
टाळ्यांचा कडकडाट झाला.

देसाई स्टेजवरुन खाली उतरणार इतक्यात एका विद्यार्थ्याने विचारलं ’सर, तो दुसरा सेल्समन
तर मार्केटिंग हेड झाला, यशस्वी झाला. पण पहिल्याच काय झाल? तो आज कुठे असेल?
तो अयशस्वी झाला? त्याच्याविषयी सांगा ना’ देसाईंनी एक क्षण त्या मुलाच्या नजरेला नजर
दिली. मग एक मंद स्मित देत म्हणाले ’ वेल, यंगमॅन, तो पहिला सेल्समन आज तुमच्या
समोर उभा आहे. मीच तो. मला वाटत अधिक स्पष्ट करायची गरज नसावी.’ हॉलमध्ये पुन्हा
एकदा टाळ्यांचा कडकडाट झाला. देसाई विद्यार्थ्यांना ऑटोग्राफस देत देत मर्सिडिज मध्ये
बसुन परत निघाले.

शुक्रवार, २३ एप्रिल, २०१०

वाढते व.....

लहानपणी ’काय बाई सांगु, कसं गं सांगु, मलाच माझी वाटे लाज, वजनाचा काटा मोडला आज’ हे गाण गाउन जाड्या लोकांची जाम टर उडवायचो आम्ही. खुप हसायचो. तेव्हा गम्मत वाटायची, पण आता...... हल्ली वजन जरा अंमळ जास्तच वाढलय. जास्त म्हणजे दिवसातुन एकदा तरी वजन वाढतय कमी करा अशी कमेंट ऎकायला मिळ्ते आणि ते कमी करण्य़ासाठी उपायही सुचवले जातात. उपाय अनेक उदा.
१) दुधीभोपळ्याचा रस अथवा पावडर खा २) जीम जॉईन करा ३) हाय कॅलरी फुड बंद करा ४) अमुक गोळ्या सुरु करा ५) अमुक डायटिशन कडे जा ६) फक्त फळ, सुप आणि सॅलेड खा, इतर जेवण बंद करा ७) सकाळी उठल्याबरोबर कोमट पाण्यात मध आणि लिंबु घालुन प्या ८) माझे सगळे आवडते पदार्थ (पावभाजी, वडापाव, पिझ्झा, चॉकलेट, आइसक्रिम, समोसा, वेफर आणि बरेच..) ज्यांची गणना जंक फुड मध्ये होते ते बंद करणे. ९) दिवसभर गरम पाणी पित राहणे. असे आणि असे अनेक उपाय सुचवण्यात आले आहेत.

हे सगळ ऎकुन त्रस्त झालेय मी आणि वजन कमी करायचा निर्णय घेतलाय. अर्थात लोकांच्या कमेंट्स हे एकमेव कारण नाहि तर हल्ली चालण्याचा वेग जरा मंदावल्यासारखा वाटतोय आणि वजन अजुन प्रमाणाबाहेर वाढले तर कमी करणे कठीण जाईल असे वाटतय. तर ... एकुण ८ किलो वजन कमी करण्याचा मानस आहे. इतक वजन कमी करायला किमान एक वर्ष तरी लागेल अस अनुभवी लोकांच मत आहे. त्यासाठी काही झेपतील(?) असे अत्याचार स्वत:वर करणार आहे - १) रोज १ तास (किमान अर्धा तास) चालणे (नेमकं कधी हा मोठा प्रश्न आहे ) २) भात(खुप कठिण आहे), बटाटा आणि साखर बंद करणे ३) रोज ३ लिटर (खुप होतं हे) पाणी पिणे ४) सो कॉल्ड ’जंक’ फुड बंद (जुलुम) ५) रात्री जमल्यास न जेवता फक्त सुप आणि फळांवर राहणे (हा पर्याय मी लास्टला ठेवलाय)
हे सगळं काल ठरवल आणि आज सकाळी नेहमीप्रमाणे निद्रादेवीचा विजय झाला आणि चालायला जायचं राहिलं. सकाळपासुन ३ चहा झाले त्यात एक बिनसाखरेचा होता. दुपारी डबा खाताना कोणाच्या तरी डब्यातुन आलेला ’पालक पनीर आणि आलुफ्राय’ खाल्ल (नाहि म्हटल तर समोरच्याला वाईट वाटेल म्हणुन). पाणी फक्त दोन ग्लास प्यायल गेलाय. आणि ऑफिस मध्ये एकाचा वाढदिवस आहे तर आइसक्रिम मागवलय. असो आज जरी माझ्या वेट कंट्रोल प्लानचे बारा वाजले असले तरी मी अजुन हार मानली नाहीये. हे मिशन पार पाडायचेच आहे.

सोमवार, ५ एप्रिल, २०१०

झू झू - आता वाजले की बारा

जाहिरात क्षेत्रातील क्रिएटीव्हिटीला दाद द्यावी तितकी थोडीच आहे... अनेकदा मूळ कार्यक्रमापेक्षा जाहिरातीच जास्त मनोरंजक असतात ..... पूर्वी लहानपणी एखादा कार्यक्रम पहाताना मध्ये जाहिरात लागली की व्यत्यत आल्या सारख वाटायच कारण पूर्वी कार्यक्रमच दर्जेदार असायचे .... पण आता काही जाहिराती दर्जेदार असतात ..... वोडाफोनच्या 'झू झू ' च्या जाहिराती अशाच आनंद देणार्या आहेत .... हे 'झू झू' आणि त्यांच्या जाहिराती मला जाम आवडतात ... (माझ्या डेस्कटॉपवर, प्रोफाइलवर तुम्हाला झू झू सापडेल :) ).... हल्ली नुकतीच मैत्रिणीने तिच्या सेल वर एक विडियो क्लिप दाखवली .... मस्त आहे .... बघा तुम्हालाही आवडेल ..... आवडली तर जरुर सांगा

शुक्रवार, १९ मार्च, २०१०

संवाद

ब: चेहरा असा का दिसतोय? काय झाल?
अ: काही नाही
ब: सांग ना .... कोणी काही बोलल का?
अ: नाही
ब: मग उदास का?
अ: हम्म
ब: प्लीज़ ..... सांग ना....... मला सांगणार नाहीस ?
अ: --------
ब: (चेहरा दोन्ही हातात घेउन) हे बघ , तू सांगितल्याशिवाय मी इथून हलणारही नाही....
( सगळ भड़भड़ा बोलल जात ..... मन हलक होत).... दुरून गाण्याचे स्वर कानावर येतात ...... 'आजा पिया तोहे प्यार दूँ .... किसलिये तू इतना उदास' ............
नकळत दोघांच्याही चेहर्यावर हसू उमलत......
*********************************************************************************************
५ वर्षानंतर ...............
ब: चेहरा कशाला पडलाय ? रोज रोज पडलेला चेहरा पहायचा मला कंटाला आलाय ..... काय झाल आता?
अ: काही नाही ......
ब: बोल पटकन काय झाल ते ..... नाहीतर नंतर म्हणशील मी विचारल नाही म्हणून .....
अ: काही नाही झाल .....
ब: काही झाल नाहीतर चेहरा पाडून कशाला बसायच ....
अ: ह्म्म्म
ब: शेवटच विचारते , सांगणार आहेस का नीट?
अ: ---------
ब: ओके ... जशी तुझी मर्जी .... नको बोलूस .... नंतर मात्र म्हणू नकोस मी विचारल नाही किंवा वेळ दिला नाही म्हणून
( पुढे कोणी काही बोलत नाही .... मन अजुन दुखावली जातात ....)...... दुरून गाण्याचे स्वर कानावर येतात ...... ' रहते थे कभी जिनके दिल में हम जानसेभी प्यारोंकी तरह....'
दोघही आपापल्या दिशेने चालु लागतात ........

( पुढे कोणी

बुधवार, १७ मार्च, २०१०

श्री स्वामी समर्थ

काल श्री स्वामी समर्थ जयंती ... त्या निमित्ताने मठात जायचे होते .... सकाळी ऑफिसला जाण्याआधी काही कारणाने जायला मिळाले नाही... मग संध्याकाळी ऑफिस सुटल्यानंतर जाऊ अस ठरवल ..... अंधेरी लोखंडवाला येथे स्वामींचा मठ आहे .... चार वर्षांपूर्वी माझ ऑफिस अंधेरी वेस्टला शिफ्ट झाल ... पण जायचा योग आला नव्हता ... काही झाल तरी आज नक्की जायच अस ठरवल .....
माझे बॉस(वय वर्षे ६५, मारवाड़ी) या मठाच्या समोरच्या बिल्डिंगमध्ये रहातात ... साधारण ४ च्या सुमारास मी त्यांना म्हटल ' मला तुमच्या घरासमोरच्या मंदिरात जायचे आहे .... तेव्हा संध्याकाळी तिथे मला सोडा' तर 'हो' म्हणाले .... आमच्यात पुढे झालेला संवाद -
मी: गर्दी असेल ना ?
बॉस: गर्दी? वहाँ क्या है? कोई जाता है?
मी: हाँ, वहाँ मंदिर है।
बॉस(कुत्सितपणे): यूपीवाले बाबा की न्यूज सुनी थी कल
माझ डोक सटकल
मी: उस न्यूज से इसका क्या रिलेशन ? व्हाटस दी पॉइंट ऑफ़ कमप्यारीजन?
बॉस गप्प ...
मी: व्हाय यू गो टू शिर्डी सो ऑफ़न ?
या प्रश्नावर उत्तर नाही? राग आला असावा... समोरून निघून गेले... ही मंडळी दर ४/६ महिन्यांनी शिर्डीला जातात... यांच्या मनात भाव / श्रद्धा किती मला खरच माहित नाही ..... 'साईंसत्चरित' नावाचा 'हेमाडपंतांनि लिहिलेला ग्रन्थ आहे हे यांना माहिती नाही .... म्हाळसापति, हेमाडपंत, चांदोरकर कोण हे यांच्या गावीही नसावे ... असो .... 'जया मनी जैसा भाव तया तैसा अनुभव'... शिर्डी प्रसिद्धि झोतात आहे म्हणून माहीत असेल आणि जात असावेत .... काहीही असो .... पण जर दुसर्यांच्या श्रद्धास्थानाबद्दल माहिती नसेल तर उगाच कोणतीही कमेन्ट करू नये अथवा तिरस्कार व्यक्त करू नये असे माझे स्पष्ट मत आहे ...
मला खुपच राग आला होता .... ऑफिस सुटल्यावर बॉसच तोंडही न पाहता निघाले.... रिक्शा केली आणि सरळ मठात पोचले ....४ वर्षानंतर आले .... स्वामींची इच्छा ..... हा मठ खुप प्रशस्त आणि सुन्दर आहे .... गर्दी होती आणि रांग लावून स्वामींच दर्शन घेतल .... गाभार्यात खुपच सुगंध, प्रसन्नता आणि स्पंदन जाणवली ... नंतर शांतपणे बसून प्रसाद घेउन निघाले .... मन शांत झाल ..... ।। श्री स्वामी समर्थ ।।

मंगळवार, १६ मार्च, २०१०

पाचशेची नोट

काल संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर स्टेशनला जाण्यासाठी नेहमीप्रमाणे रिक्षाची वाट पाहत थांबले... वीरा देसाई रोडवरून अंधेरी स्टेशनसाठी रिक्शा मिळन कठीण झालय.... त्यात हल्ली मेट्रोच काम सुरु असल्यामुले स्टेशन ला पोचायला खुप वेळ लागतो आणि रिक्शा यायला तयारही होत नाही ...... अजुन दोन बायका रिक्शासाठी उभ्या होत्या.... एक रिक्शा आली.... त्या दोघिनी विचारल 'नवरंग'? ... तो नाही म्हणाला... मग मी स्टेशन विचारल तर हो म्हणाला ..... चला रिक्शा मिळाली..... आत बसले .... तेवढ्यात एक बाई आली..... साधारण चाळीशिची असेल ..... म्हणाली मलापण स्टेशन ला जायचय ... क्यान आय ज्वाइन?... बाई एकदम हायफाय.... तसाही रिक्शा मिलन प्रोब्लेम असतो , म्हटल ओके .... ती पण बसली .... रिक्शा निघाली ..... मग रस्त्यात मी कुठे जॉब करते, कुठे राहते वगैरे चौकशी तिने माझी केली .... आणि स्वतः ठाण्याला राहते म्हणाली.... मग म्हणाली .... ५०० रु सुट्टे आहेत का ? माझ्याकडे होते पण मी नाही म्हणाले .... न जाणो नोट खोटी असली तर आपल्याला फटका बसायचा ......मग जस स्टेशन जवळ आल तस तिने रिक्शावाल्याला विचारल आपके पास ५०० का छुट्टा है ?..... तोही नाही म्हणाला .... मग मला म्हणते आता मी पैसे कसे देऊ ? मी म्हटल ओके ... मी दिले रिक्षाचे २६रु .... ह्या बाईने सुट्टे १,२ किंवा जे काही सुट्टे असतील ते बघायला / काढायला पर्स ओपनही केली नाही ..... ही फ़क्त ५०० रु नोट घेउनच फिरत असेल का ? मी ओके म्हटल्यावर ही बाई साध थ्यांकयु ही न म्हणता उतरून चालु पडली .... म्हटल जाऊदे ... बहुतेक हिची नोट पण खोटी असावी माझे ५०० रु वाचले किंवा मग हिला अशी फुकट स्टेशन ला जायची सवय असावी .... असो माझा फायदा काही नाही झाला पण नुकसान नाही झाले हे काय कमी आहे ?

सोमवार, १५ मार्च, २०१०

नैराश्य

माहित नाही का पण गेल्या काही दिवसांपासून खुप नैराश्य आणि फ्रस्ट्रेशन आलय ...... काहीच करावस वाटत नाही .....ऑफिस मध्ये पण कामात लक्ष लागत नाहिये.... कोणताच काम धड होत नाहिये ...... मन फार विचित्र झालय..... कसलाही उत्साह नाही .... कसलाही आनंद नाही ...... अगदी टिव्ही पहवासाही वाटत नाहीये ..... वाचन करावास वाटत नाहिये... बोलावस वाटत नाहीये ........ खुप बैचेनी आणि उदासीनता आलिय ...... कधी आणि कशी यातून बाहेर पडेन माहीत नाही ...... मन मनास उमगत नाही .... मज तुझी .................

गुरुवार, ४ मार्च, २०१०

नम्र विनंती

ब्लॉगर मित्र आणि मैत्रणीना एक नम्र विनंती कराविशी वाटते ..... कृपया सगळ्यांचे ईमेल आयडी टाकुन मेल पाठवण्याचा प्रकार थांबवा ......... मेल वाचण्यासाठी खरच वेळ नसतो ....... जो वेळ आहे तो मेल वाचण्यात आणि ते वैतागुन डिलीट करण्यात घालावण्यापेक्षा ब्लॉग वाचण्यात घालवावा आणि सत्कारणी लावावा असे वाटते.... मेल आपण आपल्या परिचिताना पाठवावेत आणि सहकार्य करावे....... धन्यवाद ..... या विषयासाठी ब्लॉग वर पोस्ट टाकल्याबद्दल क्षमस्व.......

गुरुवार, २१ जानेवारी, २०१०

शुक शुक .... कुठे गेला तो?

मिड डे मध्ये आलेल्या बातमीनुसार माननीय छगन भूजबळ यांचा रुपये तीन लाख किमतीचा पोपट त्यांच्या रामटेक या निवासस्थानावरून हरवला आणि तब्बल तीन दिवस मुंबई पोलिस, भुजबळसाहेबांचे सुरक्षारक्षक आणि पक्षकार्यकर्ते अतिमहत्वाच्या 'पोपट शोधमोहिमेत' व्यस्त होते...... शेवटी काल दुपारी २ वाजता हे पोपट महाशय दिलीप वळसे पाटिल यांच्या बंगल्याच्या आवारात असलेल्या नारलाच्या झाडावर बसलेले दिसले..... त्यानंतरही अनेक तासांच्या अथक परिश्रमानंतर ह्या पोपटाला पकडण्यात यश आले....... या सर्व प्रकारात बऱ्याच गोष्टी विचार करण्यासारख्या आहेत, पण त्यातील ३ महत्वाच्या ------ १) पोलिसाना या प्रकारची अतिमहत्वाची कामे असतात २)पोलिस पक्ष्याइतकेच महत्व गुन्हेगार पकड़ण्याच्या कामाला देऊन इतकी चपलता दाखवू शकत नाहीत का? ३) भुजबळसाहेब अमेरिकन जातीचा रुपये ३ लाख किमतीचा पोपट घरी जतन करू शकतात मात्र त्यांच्या राज्यातील जनता कांदे, भाज्या कशा परवडणार याचा विचार करत राहते

गुरुवार, १४ जानेवारी, २०१०

ब्रेकिंग न्यूज

काल रात्री टिव्ही ऑन केला तर जवळ जवळ सगळ्याच चेनेल वर एक ब्रेकिंग न्यूज - ३ तासांत ३ विद्यार्थ्यांच्या आत्महत्या..... ही बातमी खुपच हायलाईट केली जात होती .... सकाळी पेपर मध्ये पण बारावीच्या २ मुलींच्या आत्महत्येची बातमी ..... ह्या बातमीला अवास्तव रंजित करून दाखवल जातय असा वाटतय..... सध्या परीक्षा जवळ आल्या आहेत ... विद्यार्थी आधीच टेंशन मध्ये आहेत ... अशा बातम्यांच जर वारंवार ह्यामरिंग होत राहिल तर कमकुवत मनाची आणखी मुलं हा मार्ग स्वीकारतील आणि हे प्रमाण अजुन वाढेल ..... मुलांची मनस्थिति आधीच तणावग्रस्त आहे अशा परिस्थितीत सकारात्मक वातावरणनिर्मिती व्हायला हावी..... पण अगदी विरुद्ध वातावरणनिर्मिती होत आहे ....
मुलांच्या मनावर परिणाम होईलच पण त्याचबरोबर पालकही मुलाना अभ्यास कर अस निर्धास्तपणे सांगू शकणार नाहीत .... आपल्या बोलण्याचा टेंशन घेउन आपल पाल्य चुकीचा मार्ग तर स्वीकारणार नाही ना ही भीती त्यांच्या मनात सतत राहिल .....
वर्तमानपत्र आणि टिव्ही वर या बातम्यांची प्रसिद्धि थांबवावी अस माझ तरी स्पष्ट मत आहे ......

शुक्रवार, ११ डिसेंबर, २००९

आपल्यासाठी वेळ नसावा?

आपण मनापासून प्रेम कराव... अगदी मनापासुन प्रत्येक आवडनिवड जपण्याचा प्रयत्न करावा.... प्रेमाच्या व्यक्तीसाठी काहीही कराव .... प्रत्येकवेळी भेटायला बोलावल्यावर हातात असलेली नसलेली महत्वाची बिनामाहत्वाची काम बाजूला ठेउन अगदी दुनियेला बाजूला सारून भेटायला जाव... अर्थात ही भेट आपल्यालाही हवीहवीशी असते ..... पण कधी आपण भेटायला बोलवाव..... अगदी मन अस्वस्थ आहे म्हणून ... आणि थोड़ी आडजस्टमेंट करून भेटन सहज शक्य असताना ती करून भेटायला येऊ नये...... काय बोलायच .... प्रत्येक वेळी स्वताच्या कामांचाच तेवढा सोयीस्कर विचार करायचा आणि मला मात्र प्रेमापुढे काहीच दुसर दिसत नाही.... मनस्थिति ठीक नसताना अपेक्षीत भेट न झाल्याने मन अजुन उदास ....

भय इथले संपत नाही....

काल ऑफिसच्या कामासाठी दमणला गेले होते ..... दुपारी एक मीटिंग होती.... बैंकेतुन काही रक्कम काढून त्या व्यक्तीला देऊन एक व्यवहार पूर्ण करायचा होता.... साधारण दोनच्या सुमारास ऑफिसमधून निघाले .... रक्कम काढली आणि त्या कन्सल्तंतच्या ऑफिस कड़े निघाले .... त्यांच्या मूळ ओफिसचे काम चालू आहे ... म्हणून अगदी ५ मिनिटांच्या अंतरावर सध्या भाड्याने दुसरे ऑफिस घेतले आहे.... ह्या ऑफिसची बिल्डिंग सिनेमागृहाला लागुन आहे.... माझी कार तिथे पोचायला आणि सिनेमा सुटायला एकच गाठ पडली..... दमण हे ठिकाण म्हणजे दारू आणि दारुडे मुबलक..... गुजरात मधे दारुबंदी आहे... बरीचशी गर्दी दमणला दारू ढोसन्यासाठी होते... तर... एकदम गर्दी बाहेर आली .... एक साधारण १८ ते २० वर्षाचा मुलगा कार जवळ आला आणि माझ्या बाजुचा दरवाजा त्याने उघडला... आणि काही बोलला .... पिउन तर्र.... तो काय बोलला हे मला समजल नाही म्हणून मी बाजुच्या सिटवर बसलेल्या ड्राईवर कड़े पाहिला तर तोच मला विचारतो तो काय बोलतोय.... लगेच दुसऱ्या क्षणी मी गाडीचा दरवाजा आत ओढून घेतला... त्या मवाल्याने तो जोरात पकडून धरला होता पण देवाच्या कृपेने मी दरवाजा लावून घेण्यात यशस्वी झाले..... ड्राईवरला कार लॉक करायला सांगितली..... तो मुलगा कार जवळून हलेना .... तिथे जवळ उभ्या असलेल्या दुसऱ्या मुलाला शिव्या घालून मारायला लागला...... मी ज्यांना भेटायला गेले होते त्यांना फ़ोन केला ... ते म्हणाले मी पाठवतो कोणाला तरी खाली ..... तोवर या मुलाने अजुन कार च्या आसपास कोणाकोणाला मारायला सुरुवात केली ..... मला गाड़ीतुन उतरण कठीण झाल होता.... मी परत फ़ोन करून त्यांना तुम्ही स्वतः खाली या, मी वर येऊ शकत नाही असा सांगितल.... त्यावर ते ओके म्हणाले ... पण समोरची बिघडत चाललेली परिस्थिति पाहून मी ड्राईवरला कार परत फिरवून घ्यायला सांगितली ... जशी कार टर्न करायला सुरुवात केली तसा तो मुलगा गाड़ी जवळ येउन गाड़ीवर मारायला लागला .... ड्राईवरच्या बाजुचा दरवाजा उघडायचा प्रयत्न करू लागला ... गाड़ी फिरवून अपोसिट रोडवर आणण्यात आम्ही यशस्वी झालो ... तो परत तिथे अजुन कोणाला मारत राहिला .... इतकी गर्दी जमा झाली होती रोडवर पण सगळे बघे.... ४ लोकानी धरून त्याला दोन लगावल्या असत्या तरी त्याने काढता पाय घेतला असता ... पण कोणी पुढे येउन तसे केला नाही ....ज्यांना फोन केला ते आले होते तेवढ्यात खाली आले ... मी कार मधून बाहेर पडलेच नाही... मीटिंग आणि व्यवहार कार मध्ये पार पाडला ... आणि परत ऑफिसला आले..... एका महिन्याच्या आतच असा दूसरा किस्सा घडल्याने मन जरा उदास झालय... थोड़ी भीती थोड़ा टेंशन .... दिवसाच्या अशा घटना घडतात ... बघणारे बघतात, ज्यांनच्या सोबत घडतात ते काही दिवस टेंशन घेउन बसतात आणि कायदा आणि सुरक्षेचे रखवालदार झोपा काढतात ...... घरी आईला नाही सांगितल कारण ती आधीच्याच प्रकारातुन बाहेर आलेली नाहीये ... हे सांगितल तर उगाच टेंशन घेउन बसेल ... तुर्तास माझ्यासाठी तरी काळ वाईट दिसतोय..... अधिक सावध रहायला हवे .....

गुरुवार, ३ डिसेंबर, २००९

मुर्खपणाचा कळस

आजच्या मिड डे मध्ये एक बातमी आली आहे .... त्यानुसार रेलवे प्रशासनाकडे प्रवाश्यांच्या काही सूचना, तक्रार, मागण्या आल्या आहेत ...... त्यामध्ये एक अनामिक प्रवाशाने 'पान / मावा खावुन थूंकण्यासाठी खिडकीला गज नसावेत' अशी फालतू मागणी केली आहे ..... आताही गज असताना सगळ्या प्रकारचा कचरा खिडकीतुन बाहेर टाकला जातोच...... आता यांना थूंकण्यासाठी गज नकोत ..... अशी मागणी करण्यापूर्वी एकदाही सुरक्षतेचा विचार मनात आला नाही? ट्रेनमध्ये भिरकावलेल्या दगडांच्या केसेस विसरले काय? असल्या फालतू मागण्या करताना लाजही वाटू नये ?

बुधवार, १८ नोव्हेंबर, २००९

मुंबई सुरक्षित आहे का?

शुक्रवार दिनांक १३.११.२००९ रोजी संध्याकाळी साधारण ७.४५ च्या सुमारास मी खारवेस्ट वरून ऑटो पकडली कुर्ला वेस्ट साठी..... खरतर मला कुर्ला ईस्टला जायच होत .... पण ऑटोवाला म्हणाला कुर्ला वेस्ट जाऊंगा.... बैठना है तो बैठो.... मी बसले ... मनात म्हटल कुर्ला वेस्ट तर कुर्ला वेस्ट ..... ऑटो हातची जाऊ द्यायची नव्हती ...... ऑटोने 'बीकेसी'त एंट्री घेतली ... पोलिसांची नाकाबंदी होती नेहमीची.... पुढे गेलो.... लेफ्ट साईडला असलेल्या बीकेसी पोलिसस्टेशनवर नजर पडली ...... इमारतीला काचा असलेला पोलिसस्टेशन.... बाहेरून आतलं सगळ दिसत होत... पॉश एरियाप्रमाणे पॉश पोलिसस्टेशन असा विचार करत पुढे निघाले... बाजुलाच असलेला पेट्रोल पंप क्रॉस केला... सिग्नल क्रॉस केला .... ऑटो पुढे गेली... इतक्यात .... एक बाइक ऑटोच्या राइट साईडला अगदी बाजूला आली..... जवळ जवळ चिकटून.... बाइकवर दोघजण होते.... मला काहीसुचायच्या आतच पाठी बसलेल्या मुलाने ऑटोत हात घालून माझी पर्स खेचून घेतली... आणि लगेच बाइक बाजूला झाली ....मी ओरडायला लागले.... जितक्या शिताफीने त्याने पर्स उचलली तितक्याच शिताफीने तीच पर्स बाइकच्या नम्बरप्लेटवर धरली... मी नम्बर सुद्धा पाहू शकले नाही.... बाइकने स्पीड घेतला .... ऑटोवाल्याने स्पीड वाढवून पाठलाग करण्याचा प्रयत्न केला पण बाइकच्या स्पीड पुढे ऑटोचा काय निभाव लागणार ..... मी ऑटोवाल्याला यु टर्न घ्यायला सांगितला.... ऑटो बीकेसी पोलिस स्टेशनला आणली... आधी पोलिसस्टेशन पाहिल होत तेव्हा कल्पनाही नव्हती की काही मिनिटातच आपल्याला आत जाव लागणार आहे.... आत गेले ..... समोर एका टेबलवर काही हवालदार बसले होते त्याना सांगितल... त्यानी दुसऱ्या एका टेबलवर बसलेल्या हवालादाराकडे जा सांगितल..... तिकडे गेले तर हे हवालदारसाहेब अजुन एक दोन हवालदारसोबत काही रिव्होल्वरच्या नोंदी करत बसले होते..... मला बसायला सांगितल..... अगदी सुवाच्य अक्षरात नोंदी करून झाल्यावर हवालदारसाहेब फ्री झाले..... मग मी पुन्हा काय घडल ते रिपीट केला..... सगळ ऐकल्यावर म्हणाले 'पीएसआय ' साहेब आतमध्ये मोठ्या साहेबांकडे आहेत.... येतील आता लगेच बाहेर..... त्याना सांगा..... यात किती वेळ गेला असेल विचार करा ..... साहेबांची वाट बघण्याशिवाय काही पर्याय नव्हता ..... १० /१५ मिनिटांनी साहेब आले .... पुन्हा कैसेट रिपीट केलि...... पर्समध्ये काय काय आहे विचारून घेतल....... रु ३५०० रोख, क्रेडिट कार्ड, 'पेनकार्ड, वाहनचालक परवाना, रेलवेपास, इतर काही मौल्यवान ऐवज आणि ऑफिसचे महत्वाचे काही पेपर होते.... साहेबांनी दोन तिन सिव्हिल ड्रेसमधले हवालदार आणि गाड़ी दिली व पूर्ण एरियात फेरी मारून यायला सांगितले..... आता इतक्या वेळानंतर ते चोर तिथे थांबले असतील का? पण काय करणार..... गेलो.... एक एरियात राउण्डमारून परत आलो ....... मग माझ्या समोर दोन रजिस्टर ठेवली .... आरोपींचे फोटो असलेली .... ओळखा...... काही क्षणातच घडलेली घटना आणि शिवाय अंधार .... चेहरा नीट पाहता आला नाही ...... फोटो नाही ओलखता आला .... बाइकचा नम्बर पाहीला का ? नाही .... पर्स धरली होती...... किती वेळा तेच तेच सांगायचा..... बाइक कोणत्या मेकची होती? मेक पहायला वेळच कुठे होता.... साहेब म्हणाले ' मी जे जे कागदपत्र हरवले त्याचे सर्टिफिकेट देतो, दुसरे बनवून घ्या... पर्स आम्हाला मिळाली, कोणी आणून दिली की तुम्हाला फ़ोन करतो, तुम्हाला काही विचारायचा असेल तर केव्हाही फ़ोन करा' तुम्ही बाइकचा नम्बर पाहिलेला नाही, आरोपींचा वर्णन सांगता येत नाहीये, १०० वेळा पोलिसस्टेशनला खेटे घालावे लागतील, कंप्लेंट नाही पण सर्टिफिकेट देतो, तुमच काम होइल, मी तुम्हाला सहकार्य करतोय, तुम्ही आम्हाला सहकार्य करा'.... असा म्हणून ते सर्टिफिकेट देऊन माझी रात्रि १०.३० वाजता पाठवणी केलि..... आजमितिस काही पर्स मिळालेली नाही....... अजुनही तो प्रसंग माझ्या डोळ्यासमोरून जात नाही..... एकट्याने ऑटो मध्ये बसायची पण भीती वाटते ......

शनिवारच्याच टाइम्स मध्ये अशीच घटना ३.११.२००९ बांद्रा वेस्टला घडल्याची बातमी होती.... शोपिंगला जाणार्या दोघी ऑटोवाल्याला भाड़ देत होत्या तेव्हा बाइकवरून दोघानी त्यांची पर्स चोरली.... पुढे पेट्रोल पंप वर त्या चोरानी चोरलेल्या क्रेडिटकार्डचा वापर करून पेट्रोल पण भरलं.... पोलिसाना बाइकचा नम्बर पण मिळाला... पण अजुन काही तपास लागलेला नाही..... रोजच्या पेपरमध्ये अशा बातम्या येत असतात..... जितके गुन्हे घडतात त्याच्या १% पण पेपरमध्ये छापून येत नसतील..... मोर्निंगवॉकला जाणार्या किती स्त्रियांची मंगलसुत्रे चोरीला जातात ...... काय सुरक्षा राहिली आहे मुंबईत ..... आणि पोलिस जर असेच दुर्लक्ष करत राहिले तर पुढे मुंबईची काय परिस्थिति होइल विचार करा ..... रस्त्यावरून चालण्याची सोयही राहणार नाही......