ब्लॉगवर आपले स्वागत आहे

मंगळवार, २९ सप्टेंबर, २००९

घन तमी शुक्र बघ राज्य करी

काल ग्रन्थ घेउन महिषासुरमर्दिनीचं एक आख्यान वाचत होते .... वाचताना एक उल्लेख आला... घनदाट निबिड़ अशा तम्रतामस नावाच्या अरण्यात अंधाराचे उपासक शुक्राचार्य उपासना करीत असत.... आता शहाण्यासारखं पुढे वाचत राहाव की नाही? पण आमचं मन म्हणजे डूरक्या (वळू मधला ... आठवला?) ... एक जागेवर स्थिर रहाणार नाही.... याला वेसण घालून मुसक्या बांधून कसं ठेवाव तेच कळत नाही ... जाउदे... मी लगेच लागले गाणं शोधायला .... हे शब्द कुठच्या तरी गाण्यात आहेत .... आठवेना ..... मग बऱ्याच वेळाने आठवलं.... घन तमी ... नेट गाठला .... पूर्ण गाण मिळवलं... इथेपण मनाला फटके .... आनंद झाला .... रचना - भा रा ताम्बे, संगीत - हृदयनाथ मंगेशकर आणि स्वर - लता मंगेशकर .... पुढे काय बोलावे ......

घन तमी शुक्र बघ राज्य करी
रे खिन्न मना बघ जरा तरी

ये बाहेरी अंडे फ़ोडूनी
शुद्ध मोकल्या वातावरणी
का गुदमरसी आतच कुढुनी
रे मार भरारी जरा वरी

प्रसवे अवस सुवर्ण अरुणा
उषा प्रसवते अनंत किरणा
पहा कशी ही वाहे करुणा
का बागुल तू रचितोस घरी ?

फूल हसे काटयांत बघ कसे
काळया ढगी बघ तेज रसरसे
तीव्र हिमातुनी वसंतही हसे
रे , उघड नयन, कळ पळे दुरी

फुल गळे, फळ गोड झाले
बीज नुरे डौलात तरु डोले
तेल जळे बघ ज्योत पाजळे
का मरणी अमरता ही न खरी ?

मना वृथा का भिसी मरणा
दार सुखाचे ते हरी - करुणा
आई पाहे वाट रे मना
पसरुनी बाहू कवळण्या उरी

1 टिप्पणी: